Maha Shivratri San Chi Mahiti
महाशिवरात्री सणाची माहिती
महाशिवरात्रीच्या दिवशी हे घोंगलाचे फूल शिवाला वाहण्याची विदर्भात पद्धत आहे.
माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी शैव पंथीय उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो.
`महाशिवरात्री’ म्हणजे काय ?
पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात.
महाशिवरात्रीचे व्रत का करावे ?
शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे।