Jo Aaplyavar Upkar Karto Tyala Kadhi Hi Visru Naye
बासरीवाला मुलगा
अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात खूप उंदीर झाले होते. घरात, शेतात, दुकानात सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर होते. त्यामुळे अन्न – धान्याचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण, अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. त्यामुळे गावकरी खूप त्रस्त होतात.
ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या गावातील एका बासरीवाल्या मुलाला कळते. मग तो गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की, ‘मी या उंदरांचा बंदोबस्त करू शकतो पण त्या बदल्यात तुम्ही मला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.’ गावकरी तयार होतात.
मग, तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरू लागतो. त्याच्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्यामागे धावू लागतात. तो मुलगा गावाबाहेरील नदीत जातो त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात. बासरीवाला मुलगा गावकऱ्यांकडे आपल्या कामाचा मोबदला मागतो परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला शंभर सुवर्णमुद्रा दयायला नकार देतात. बासरीवाल्याला कळते की गावकरी लबाड आहेत. तो म्हणतो की, ‘आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते बघा.’ तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो. पण यावेळी बासरीच्या आवाजाने गावातील लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व तेही त्याच्यामागे धावू लागतात.
गावकऱ्यांना भीती वाटू लागते की, बासरीवाला उंदराप्रमाणे आपल्या मुलांनाही नदीत घेऊन जाईल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवतात व ठरल्याप्रमाणे शंभर सुवर्णमुद्रा देतात.
तात्पर्य – “जो आपल्यावर उपकार करतो त्याला कधीही विसरू नये. ”