Holi San Chi Mahiti
होळी सणाची माहिती
होळी हा संपूर्ण भारतामध्ये विशेषत: उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला “होळी पौर्णिमा” असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो.फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासूनपंचमी पर्यंत या ५-६ दिवसांत, कुठे दोन दिवस तर कुठे पाचदिवस हा उत्सव साजरा केला जातो.
भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला “फाल्गुनोत्सव”, आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त “वसंतागमनोत्सव” किंवा “वसंतोत्सव” असेही म्हणण्यात येते.
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.
होळीचे महत्त्व :
होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.
होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळून होळी साजरी करतात. दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते.नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात.
एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.
थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला.आता थंड पाण्याने स्नान करू शकता असे सांगतही होळी येते. यानंतरची रंगपंचमीही सृष्टीचा नवा रंग दर्शवणारी असते.