Adala Hari Gadhvache Pay Dhari



“अडला हरी गाढवाचे पाय धरी “
अर्थ – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते.

गोष्ट- दुष्ट धनगर

एका गावात एक अतिशय भडक व तापट डोक्याचा धनगर रहात होता. एकदा हा धनगर त्याच्या मेंढीच्या अंगावरील सर्वच्या सर्व लोकर कातरून घेत होता, म्हणून ती बिचारी मेंढी त्या धनगराला विनवणी करून म्हणाली, “धनी, हे थंडीचे दिवस आहेत. या थंडीत मला थोडीशी तरी ऊब मिळावी यासाठी तुम्ही माझ्या अंगावरची सर्व लोकर न काढता, तिचा थोडासा तरी थर माझ्या कातडीवर राहू द्या.”

मेढींचे ते बोलणे ऐकून तो तापट असलेला धनगर अजूनच चिडला व तिला म्हणाला, “मला अक्कल शिकवतेस काय? थांब आता मी देखील तुझ्या लक्षात राहील असा धडा तुला शिकवतो.”

असे म्हणत त्या धनगराने त्या मेंढीचे एक अतिशय कोवळ व लहान असलेले कोकरू दगडावर आपटून ठार मारले. आपल्या कोकराला विनाकारण मारलेले बघून ती मेंढी दुःखाने अजूनच बेभान झाली व धनगराला म्हणाली, “धनी, तुम्ही किती क्रूर आहात! माझ्यावरील राग तुम्ही माझ्या निरपराध असलेल्या लेकरावर काढलात?”

मेंढीचे ते बोलणे ऐकून तो उलटया काळजाचा धनगर तिला म्हणाला, “मी बघतो आहे की, मी दिलेल्या धडयापासून तू काहीच बोध घेतलेला दिसत नाही; तेव्हा आता तुझे तोंड कायमचे बंद करण्यासाठी, तुझ्यासमोर तुझे दुसरे कोकरूही आपटून मारले नाही, तर मी नावाचा धोंडू नाही.”

धनगराने ती दिलेली क्रूर अशी धमकी ऐकून ती मेंढी आधीच आपल्या लेकराच्या विरहाने दुःखी झालेली होती. तेव्हा ती स्वतःशीच म्हणाली, ‘हा क्रूर असलेला तापट डोक्याचा धनगर बोलल्याप्रमाणे वागल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपल्या दुसऱ्या बाळाचे प्राण वाचविण्यासाठी आपल्याला ‘अडला हरी, गाढवाचे पाय धरी’ या म्हणीप्रमाणेच वागले पाहिजे.’

मनाशी असा निश्चय करून ती दुबळी असलेली मेंढी त्या धनगरापुढे आपले मस्तक वाकवून, अतिशय गयावया करीत त्याला म्हणाली, “धनी, खरेच, मीच महामुर्ख असून, आपल्यासारखे चांगले आपणच आहात. तेव्हा खरोखरच मला क्षमा करा व माझ्या दुसऱ्या लेकराला कृपा करून जीवदान द्या.”

मेंढीला आता आपली थोर योग्यता कळून आली आहे असा गैरसमज झाल्याने, त्या धनगराने तिचे ते दुसरे कोकरू मारण्याचे रद्द केले आणि मेंढीचा हेतू साध्य झाला.
तरूणाचे नसते शहाणपण

एका गावात एक तगडा असा इसम रहात होता. त्याचा आपल्या स्वतःच्या जिभेवर अजिबात ताबा नव्हता. एके दिवशी तो इसम आपल्या गावाहून दुसऱ्या गावी पायी पायी जात होता तेव्हा त्याला वाटेत एका वाटमाऱ्याने अडविले. त्याने त्या वाटमाऱ्याशी बराच वेळ झुंज दिली. अखेरीस तो खूप दमला, ते पाहून त्या वाटमाऱ्याने त्याच्यावर अजून जोरदार हल्ला चढविला आणि त्याला बेदम मारले. त्यामुळे अगदी नाईलाजाने तो इसम गुपचुप शांत उभा राहिला.

तो शांत झालेला पाहून त्या लुटारूने त्या इसमाच्या शर्ट व पँटचे सर्व खिसे तपासून पाहिले परंतु त्यात त्याला काहीही मिळाले नाही. तेव्हा तो अतिशय चिडून त्या इसमाला म्हणाला, “अरे, जर तुझ्याकडे औषधाला देखील पैसे नव्हते तर मग तुला माझ्याशी एवढी मारामारी करण्याची काय गरज काय होती? अरे दीडशहाण्या, तू दरिद्री तर आहेसच, पण त्याशिवाय तू मूर्ख देखील आहेस.”

तो लुटारू त्या इसमाला असे बोलून तेथून जायला निघाला असता तो इसम रागाच्या भरात त्याला म्हणाला, “ए महामुर्खा! तू कोणाला दरिद्री व मूर्ख म्हणतोस? मला? अरे, मी जर दरिद्री असतो, तर या वेळेला माझ्याकडे रोख दहा हजार रूपये असते का? आणि मी जर मुर्ख असतो तर तुझ्यासारख्या दरिद्री वाटमाऱ्याकडून माझे ते पैसे लुटले जाऊ नयेत म्हणून माझे डोके वापरून ते पैसे माझ्या दोन्ही पायांतील बुटांच्या तळांशी लपवून ठेवले असते का? मी शहाणा आहे म्हणूनच ही युक्ती करू शकलो ना?”

त्या इसमाच्या तोंडून ते गुपित ऐकून त्या लुटारूने त्याला आणखी बेदम मारले आणि त्याच्या दोन्ही पायांतील बूट काढले व त्यांत लपविेलेले दहा हजार रूपये घेऊन तो तेथून निघून गेला.

तो वाटमाऱ्या तेथून निघून जाताच तो इसम स्वतःशीच म्हणाला, “खरे पाहिले तर, तो लुटारू आपले खिसे तपासून त्यांत पैसे नाहीत असे बघून आल्या वाटेने जाण्यास निघाला होता. परंतु त्याने आपल्याला जाता जाता ‘दरिद्री’ व ‘मूर्ख’ अशा शिव्या दिल्या. आता हे मला कळायला पाहिजे होते की, त्याने तसे म्हटल्याने आपण थोडेच दरिद्री व मूर्ख ठरणार होतो? पण काय करणार, नको तेव्हा आपली जीभ पाघळली व त्यामुळेच आपल्यावर हे संकट ओढवले, म्हणजेच काय तर, ‘आधी बुद्धि जाते आणि मग भांडवल जाते’ असे म्हणतात तेच खरे आहे.”
20/25

More Entries

    None Found

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading